महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस २९ दिवसांत शिक्षा – पालघर पोलिसांची जलद आणि ठोस कारवाई
महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस २९ दिवसांत शिक्षा – पालघर पोलिसांची जलद आणि ठोस कारवाई
पालघर – केळवे रोड परिसरात एका महिलेसोबत छेडछाड व विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला अवघ्या २९ दिवसांत शिक्षा सुनावण्यात आली असून, ही कारवाई पालघर पोलिसांसाठी उल्लेखनीय ठरत आहे.
दिनांक ३० मार्च २०२५ रोजी रात्री ८.३० वाजता धोंदलपाडा, केळवे रोड (पूर्व) येथे पीडित महिला टिकली तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल घेऊन पायी जात असताना, आरोपी ओमकार संतोष जाधव (रा. पिलाजीनगर, केळवे रोड पूर्व) याने तिच्या अंगावर धाव घेत, तोंड दाबून, मान पकडून अडवले. महिलेने प्रतिकार करून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपीने तिच्या साडीला मागून पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
फिर्यादीवरून सफाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४ अंतर्गत ३१ मार्च २०२५ रोजी दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सपोनि दत्ता शेळके (प्रभारी अधिकारी, सफाळा पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली, तपासिक अंमलदार पोना बी. के. भावर यांनी २४ तासांच्या आत पुरावे गोळा करून १ एप्रिल २०२५ रोजी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
मा. प्रथमवर्ग न्यायाधीश श्री. के.जी. सावंत यांनी सरकारी वकील श्रीमती आशा मारवाडी यांच्या युक्तिवादावर आधारित निकाल देत, दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी आरोपीस १ वर्ष सश्रम कारावास व ५,०००/- रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय अधिकारी श्री. अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्ता शेळके, कोर्ट पेरवी अधिकारी सपोउनि व्ही.पी. भोये, सपोउनि महेंद्र शर्मा, पोहवा के.बी. शेळके, पोना बी.के. भावर, मपोना एन.टी. गावित व पोअं ए.बी. मोधे यांनी केली.
Comments
Post a Comment