बोईसर-चिल्हार रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा; वाहतुकीला अडथळा, अपघातांत वाढ
बोईसर-चिल्हार रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा; वाहतुकीला अडथळा, अपघातांत वाढ
बोईसर – बोईसर-चिल्हार रस्त्यावर दिवसेंदिवस वाढणारी अतिक्रमणे गंभीर समस्या बनली असून, यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेली अनधिकृत पंचरची दुकाने आणि वेल्डिंग गॅरेज यामुळे रस्त्यांवरील वाहने चुकीच्या पद्धतीने उभी केली जात आहेत, परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
फुलाचा पाडा येथे गंभीर अपघात
बुधवारी संध्याकाळी लालोंडे ग्रामपंचायत हद्दीतील फुलाचा पाडा येथे एका अनधिकृत गॅरेजमुळे मोठा अपघात घडला. लाईफलाइन रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी आपल्या चारचाकी वाहनाने जात असताना, पंचर काढण्यासाठी भर रस्त्यात उभ्या असलेल्या वाहनामुळे महामार्गावर मुरूम टाकणाऱ्या नाशिकच्या बारा चाकी हायवा ट्रकला अंदाज न लागल्याने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक बसली. या अपघातात अधिकारी गंभीर जखमी झाले, तर त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले.
अवैध गॅरेज चालकांची बेफिकिरी
स्थानिकांच्या मते, रस्त्यालगत सुरू असलेल्या पंचरच्या गॅरेजमुळे एक संपूर्ण लेन अडवली गेल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर जखमी अधिकारी मदतीसाठी विवश होते, मात्र मदत करण्याऐवजी गॅरेज चालकाने आपले वाहन हटवण्यावर भर दिला. दरम्यान, ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
स्थानिकांची संतप्त प्रतिक्रिया; प्रशासनावर कारवाईची मागणी
बोईसर-चिल्हार मार्गावर चिल्हार, नागझरी, गुंदले, वारांगडे, मान, बेटेगाव आणि अगदी पोलीस चौकीच्या जवळच असलेल्या अनधिकृत वेल्डिंग आणि पंचरच्या दुकानांमुळे वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ग्रामपंचायत, पोलीस आणि वाहतूक विभागाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता प्रशासन जागे होईल का, की हे प्रकरणही सरकारी फाईलमध्ये धूळ खात पडणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment