पालघरमध्ये भीषण अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
पालघरमध्ये भीषण अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
पालघर : पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सातिवली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात २८ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ६:४५ वाजता घडला, तर पोलिसांनी २९ मार्चच्या पहाटे ३:४६ वाजता गुन्हा नोंदवला.
फिर्यादी संदीप पांडुरंग जाधव (वय ४४, रा. वसई, पालघर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे साडू महेंद्र गोविंद भुवड (वय ५२, रा. भुईगाव, वसई) हे त्यांची होंडा अव्हिएटर दुचाकी (MH-04-DQ-5147) घेऊन मनोर बाजूकडून मुंबईच्या दिशेने निघाले असताना सातिवली येथे श्री.जी. टाईल्स कंपनीसमोर एका अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. धडक देणारे वाहन आणि चालक फरार असून, त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 106(1), 281, 125(अ)(च) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 184, 135(अ)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यात महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळावी आणि सुरक्षित वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने अपघात करणाऱ्या वाहनाचा शोध घेतला जात आहे.
Comments
Post a Comment