कासा येथे २५ लाखांचे एमडी ड्रग्स जप्त, एक आरोपी अटकेत
कासा येथे २५ लाखांचे एमडी ड्रग्स जप्त, एक आरोपी अटकेत
कासा - पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी मोहिमेची कार्यवाही सुरू आहे. याअंतर्गत कासा पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो. नि. अविनाश मांदले यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक गस्त घालत असताना, चारोटी येथील अप्सरा हॉटेलच्या समोर एक संशयित युवक एक मोठा बॅग घेऊन जात असताना आढळला.
संशयित इसमास ताब्यात घेऊन अंगझडती घेतल्यावर, त्याच्या बॅगमध्ये कपड्यांच्या आत एक पिशवी सापडली. त्या पिशवीत सफेद कागदात सेलो टेपने गुंडाळलेले एक पुडके होते. संशयित युवकाने या वस्त्राबद्दल कोणतीही माहिती दिली नाही, ज्यामुळे त्याच्या कृत्याबद्दल पोलीसांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर पोलीसांनी स्थानिक गुन्हे शाखेला संपर्क साधून अमली पदार्थ तपासणी किट मागवली.
पो. हवा सूर्यवंशी यांच्या मदतीने तपासणी केली असता, त्यात एमडी (मेटाम्फेटामिन) अमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. या ड्रग्सचे वजन सुमारे १२५ ग्राम होते, आणि त्याची अंदाजे किंमत २५ लाख रुपये होती. रीतसर पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीचे नाव राज बाबन शेअल (वय २६ वर्ष, रा. बांद्रा, मुंबई) आहे.
संशयित आरोपी अहमदाबादवरून मुंबईला जात असताना चारोटी येथे वाहन बदलण्यासाठी उतरला होता. कासा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
Comments
Post a Comment