गुजरात गॅस पाईपलाईन पुन्हा लिकेज; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
गुजरात गॅस पाईपलाईन पुन्हा लिकेज; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
बोईसर : तारापूर एमआयडीसीमध्ये गुजरात गॅस पाईपलाईन लिकेजच्या वारंवार घटना घडत असून ही तीसरी घटना आहे त्यामुळे आता नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये सोमवारी दुपारी पुन्हा एकदा गुजरात गॅस पाईपलाईन लिकेज झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. कोलवडे रस्त्यावर सुरू असलेल्या रस्ता दुरुस्ती व गटार बांधणीच्या कामादरम्यान जेसीबीच्या बकेटचा धक्का लागून गॅस पाईपलाईन लिकेज झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गॅसचा रिसाव झाल्याची माहिती मिळताच गुजरात गॅसच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तत्काळ पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र, याआधीही एमआयडीसीतील जे प्लॉटमध्ये अशाच प्रकारे जेसीबीच्या धडकेने गॅस लिकेज झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने गुजरात गॅस प्रशासनाने पाईपलाईनच्या देखरेखीसाठी पगारधारक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असली, तरीही वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
तारापूर एमआयडीसीमधील औद्योगिक कंपन्यांमुळे आधीच अपघात, आग आणि अन्य धोक्यांच्या सावटाखाली नागरिक वावरत असताना, गॅस पाईपलाईनमधील सातत्याने होणारे लिकेज अधिकच धोकादायक ठरत आहेत. नागरिकांनी या घटनांमुळे आपल्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली असून, गुजरात गॅस प्रशासनाकडून अधिक सतर्कता बाळगण्याची मागणी केली आहे.
स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, "पाईपलाईन सुरक्षेच्या नावाखाली कर्मचारी असतानाही असे अपघात का घडतात?" तसेच, यापुढे अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Comments
Post a Comment